
https://twitter.com/ICC/status/1407843696205340675
साऊदम्पटन : विराट कोहलीचं आयसीसीच्या पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचं स्वप्न भंगलं, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली. केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. न्यूझीलंडनं इतिहास रचताना टीम इंडियावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या आणि राखीव दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. सामन्याचा राखीव दिवस अतिशय रंजक ठरला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा पहिला डाव २१७ धावात आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारतीय संघाला अवघ्या १७० धावांत गुंडाळलं.
https://twitter.com/BCCI/status/1407760120772141057
न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या १७० धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या.
https://twitter.com/ICC/status/1407807172298240000
दुसऱ्या डावात टीम इंडियाचा संपूर्ण संघ १७० धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला १३९ धावांचं माफक आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात केली. या दरम्यान लॅथम ९ धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे १९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. त्यांनी संथ गतीने विजयाच्या दिशेला मार्गक्रमण सुरु ठेवलं. या दरम्यान, केन याने अर्धशतक झळकावलं. त्याने ८९ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर टेलरने १०० चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. केन आणि टेलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला भारताने दिलेलं आव्हान पेलनं सहज शक्य झालं. शेवटी न्यूझीलंडने भारतावर आठ गडी राखून विजय मिळवला.
https://twitter.com/ICC/status/1407822271469670400
न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या डावातही केवळ १७० धावांवर थांबवलं. पहिल्या डावात काईल जेमिसनने ५, वॅगेनर, बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊथीने १ गडी बाद केला, तर दुसऱ्या डावांत टीम साऊथीने ४, बोल्टने ३, जेमिसनने २ आणि वेगनरने एक गडी मिळवला.
न्यूझीलंडच्या काईल जॅमिसनची जादू
न्यूझीलंडने गोलंदाजीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, नील वॅगनर, काईल जॅमिसन आणि कॉलीन डी ग्रँडहोम या किवींच्या बोलिंग आक्रमणापुढे भारत घायाळ झाला. या सगळ्यांपैकी भारतीय फलंदाज एका गोलंदाजासमोर चाचपडताना खेळले. तो गोलंदाज आहे विराटच्या आयपीएल संघातील काईल जॅमिसन ! काईलचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भारतीय कर्णधार कोहलीला जर त्याने दोन्ही डावांत तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडसाठी त्यानेच तर विजयाचा पाया रचला, असं म्हणावं लागेल… कारण त्याने पहिल्या डावांत टाकलेला अफलातून स्पेल आणि दुसऱ्या डावांत भारताला दिलेले धक्के… जॅमिसनची या अंतिम सामन्यातली उत्कृष्ट कामगिरी इथून पुढची काही वर्ष स्मृतीत राहील.
काईल जॅमिसन याने या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ३१ धावा देऊन ५ फलंदाजांना तंबूत धाडलं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. पहिल्या डावात जॅमिसनने टिच्चून गोलंदाजी करत भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. भारताला मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं. या संपूर्ण सामन्यात ५ विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. दुसऱ्या डावातही त्याने चमकदार कामगिरी केली एकापाठोपाठ एक ओव्हर फेकताना त्यांने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोन मोठ्या माशांना आपल्या जाळ्यात अकडवलं. हे दोन बॅट्समन लवकर आऊट झाल्यामुळे भारताला मोठा स्कोर करता आला नाही परिणामी भारताचा ड्रॉ चा ऑप्शन देखील संपला आणि भारताला पराभवाच्या छायेत जावं लागलं.
काईल जॅमिसनने बॅटिंगमध्येही आपली जादू दाखवली. पहिल्या डावात त्याने निर्णयक २१ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला ३२ धावांची आघाडी मिळाली आणि तीच आघाडी न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरली. मॅचच्या निकालानंतर हे सगळ्यांना प्रकर्षाने जाणवलं की त्याने २१ धावा केल्या नसत्या तर न्यूझीलंड ३२ धावांची आघाडी मिळाली नसती आणि सामन्याचा निकाल काही वेगळाही लागू शकला असता…
https://twitter.com/ICC/status/1407866323690995716
न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जेतेपदाचा जल्लोष
१३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉस व केन या जोडीनं नाबाद ९६ धावा जोडल्या अन् जेतेपद नावावर केले. रॉस टेलरनं मोहम्मद शमीला स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार खेचला अन् जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. टेलरच्या या विजयी चौकारानंतर किवींच्या ड्रेसिंगरुममध्ये भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.
संक्षिप्त धावफलक – भारत ( पहिला डाव) – २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) – १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) – २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६, इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) – २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)




