
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मिटकरी यांनी राज ठाकरेंवर थेट राष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे.
‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर, राज यांच्यावर थेट 'राष्ट्रद्रोहा'चा आरोप! https://t.co/M6tEmYEE77 @RajThackeray @mnsadhikrut @amolmitkari22 @NCPspeaks @PawarSpeaks #RajThackeray #MNS #NCP #AmolMitkari #SharadPawar #Treason #CastePolitics
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, वीज अशी तीच तीच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध. मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती, आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत, वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारला.
राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील वाचलं. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे, हा वक्तव्यमागचा अर्थ होता, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पवारांच्या भेटीला जातो, तेव्हा मराठा म्हणून जात नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राला एकत्र आणायचं असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले. मग तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज न होता शाहू-फुले आंबेडकर विचार घेऊन पुढे जाणार मग छत्रपती शिवाजी महाराज मूळ विचार पुढे का घेऊन जात नाही असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला.
बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ब्राम्हण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. शरद पवारांना भेटतो ते मराठा म्हणून भेटतो का? जात पाहून आपण कुणाच्या घरात जातो का? या जातीपातीच्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. मी काय वाचलं हे मला माहित्येय आहे. प्रबोधनकार ठाकरे हे तुम्हाला परवडणारे नाहीत. आणायचे असेल तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल. प्रत्येक काळातील ती गोष्ट असते. चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. ५० साली पहिली आवृत्ती आली तेव्हापासून पुढे आलं नाही. लोकांची माथी भडकवायची. राजकारणासाठी एजेंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवलं जातं. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. त्यामुळे मी बोललो हे सगळं प्लॅन आहे असाही राज ठाकरेंनी आरोप लावला.




