
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचं आणि जामीनाचं मोठं राज्यकीय नाट्य मंगळवारी घडलं. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावरुन राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ‘संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना १७ तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
राणेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी राणेंना सल्ला दिलाय. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. अशा व्यक्तीला बोलण्याची पद्धत माहिती असायला हवी. तुम्ही महाराष्ट्रात येता, मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना मानत नसाल, पण ते मुख्यमंत्री आहेत. पोलिसांनी कायद्यानं आपलं काम केलं आहे. नारायण राणे मंत्री आहेत की अजून काही, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. नारायण राणे कॉमन माणूस आहे, तुम्ही त्यांना मोठं केलंय. आम्हालाही जनतेचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही सत्तेत आहोत. लोकशाहीत जनतेचा आशीर्वाद अनेकांना मिळाला आहे. आज मोदींना मिळालाय, मागे इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मिळाला होता, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच सुधर जाओ, संभल जाओ, अशा शब्दात राऊतांनी राणेंना सल्लाही देऊ केलाय.




