मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरती अंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार, ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पेपर लीक प्रकरणामुळे ऐनवेळी काही सरकारी विभागांच्या परीक्षांसोबतच म्हाडाच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी काहीसे गोंधळात होते. या विद्यार्थ्यांना दिलासा देताना म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रिये अंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.