गीतकार, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन
पुणे : मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५० वर्षांचे होते. मुळशी पॅटर्न, हंबीरराव, देऊळ बंद यांसारख्या अनेक चित्रपटसाठी त्यांनी गीत लेखन केलं होतं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठा धक्का बसला आहे.
मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘आरारारा खतरनाक’ हे गाणं त्यांनी लिहिलं होतंं. या गाण्याने रसिकांच्या मनावर अक्षरश: भुरळ पाडली होती. अनेक चित्रपटांसह टीव्हीवर बहुतांश मालिकांसाठीही त्यांनी गाणी लिहिली होती. शिवबा ते शिवराय या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. त्याशिवाय ‘जीवन यांना कळले हो’ या स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शनही त्यांनी केलं. “सुरक्षित अंतर ठेवा” या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक होते.
प्रणित कुलकर्णी यांनी फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवली होती. त्यानंतर त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. यानंतर त्यांनी ऑल द बेस्ट या टीव्ही मालिकेचे लेखन दिग्दर्शन केले होते. विशेष म्हणजे सध्या स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरत असलेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचेही ते लेखक होतेे.
गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केले आहे. प्रवीण तरडे व प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला आहेत. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाने फार मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.
अभिनेते प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट
“माझा प्रणितदादा गेला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते प्रवीण तरडेंनी दिली. प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर प्रवीण तरडेंनी ही पोस्टही केली.
“माझा प्रणित दादा गेला. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही .. नंतर सविस्तर लिहिलच ..देऊळबंदला माझ्यासोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गीतकार … अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला .. कायमचा…” अशी भावूक पोस्ट अभिनेते प्रवीण तरडे यांनी केली आहे.