कोरोना लस मोफत द्या, ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर ममता बॅनर्जी यांनीही मोदींचे आभार मानले आहेत. सोबतच कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकसोबत मिळून काम करतील, असा विश्वासही त्यांनी दिलाय. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचीही मागणी केलीय.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. पश्चिम बंगालचं हित लक्षात ठेवताना केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मी केंद्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देते आणि आपण एकत्र मिळून कोरोना महामारीचा सामना करु. तसंच राज्य आणि केंद्राच्या सहकार्याचा एक आदर्श निर्माण करु’. ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी थेत राज्य सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक घेतली.
लोकल बंद, बंगालमध्ये प्रवेश करताना RT-PCR चाचणी बंधनकारक
पश्चिम बंगालची धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रिय झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सध्यस्थितीत पूर्ण लॉकडाऊन लागणार नाही. अंशत: लॉकडाऊन लागू असेल. त्याचबरोबर लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय. इतकच नाही तर अन्य राज्यातून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करायचा झाल्यास तुमची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं गरजेचं करण्यात आलं आहे. हे निर्णय ७ मे पासून लागू असणार आहेत.