भाजपची धोबीपछाड; नाशकात काँग्रेस-पवार गट हाफ, ठाकरे साफ!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलटापालट
नाशिक: नाशिकमधून ठाकरे गट शिल्लक राहणार नाही, असे आव्हान भाजपचे संकटमोचक समजले जाणारे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. महाजन यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि नाशिकचे प्रभारी असलेले संजय राऊत यांनी महाजन यांना प्रत्युत्तर दिले होते. या दोन नेत्यांमध्ये राजकीय कलगितुरा रंगला होता. मात्र, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी आपला शब्द पूर्ण केला असल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिंदे सेनेत झालेल्या या इनकमिंग मुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे ३५ पैकी केवळ ४ नगरसेवक तर काँग्रेसचे ५ पैकी २ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ६ पैकी केवळ ३ नगरसेवक शिल्लक राहल्यानं नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या पक्षांसमोर सत्ताधारी पक्षाने मोठं आव्हान उभं केलं आहे.
नाशिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला सुरू असलेली गळती कायम आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, विलास शिंदे यांनी भाजप आणि शिंदे गटात शक्तिप्रदर्शन करत प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, यामुळे शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला होता.
मागील एक महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंची सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती पडझड झाली आहे. सुरुवातीला सुधाकर बडगुजर त्यानंतर विलास शिंदे आणि आता गणेश गीते आणि सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेची बिकट अवस्था झाली आहे. भाजपच होणाऱ्या या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केला आहे. खोटे गुन्हे दाखल करणे आणि त्यातून दबाव निर्माण करत हे प्रवेश घडवून आणले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेने केला आहे.





