Top Newsराजकारण

भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चढाओढ : चंद्रकांत पाटील

गिरीश महाजन म्हणतात,' कोणाला कोणते मंत्रिपद हेही ठरलेले, मात्र काँग्रेस तयार झाल्यावर पवारांनी शब्द फिरवला'

मुंबई : शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवरून राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावर महाविकास आघाडीकडून फक्त संजय राऊत बोलले असले तरी भाजप नेत्यांकडून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर भाजप आणि राष्ट्रवादीत काय बोलणी झाली? सत्ता स्थापनेसाठी काय फॉर्म्युला ठरला होता? पवारांनी शब्द का फिरवला? अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी घटक पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे’, असा दावा केलाय.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पक्षसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पाटील म्हणाले की, राज्यात गेले दोन दिवस जे घडत आहे ते आघाडीतील घटकपक्षांमध्ये बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी चालू झालेल्या चढाओढीचा परिणाम आहे. तथापि, गेल्या २६ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा आणि भाजपा आमदारांना विकासासाठी निधी नाकारण्याचा इतिहास आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल.

राणे सरकारला पुरुन उरतील !

महाविकास आघाडी सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणे व त्यांना अडकविण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता दादागिरी करून नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राणे त्यांना पुरुन उरतील, असा दावाही पाटील यांनी केलाय.

शिवसेनेसोबत यायला काँग्रेस तयार झाल्यावर पवारांनी शब्द फिरवला : गिरीश महाजन

शरद पवार हे आता अर्धसत्य सांगत आहेत, शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत. एवढेच नाही तर या बैठकीत कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं, पण जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

गिरीश महाजन यांना अजित पवार आणि फडणवीस यांच्या काय चर्चा झाली? असे विचारले असता, पहाटेच्या शपथविधी वेळी मी ही सोबत होतो, पण त्यावेळी अजित पवार आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, असे उत्तर गिरीश महाजन यांनी दिले आहे. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हा पहाटेचा शपथविधी फडणवीस आणि अजित पवारांची पाठ सोडत नाही, पुन्हा एकदा त्यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button