…मग ठाकरे सरकारवरही खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक सवाल

मुंबई : ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. केंद्र सरकारच्या या उत्तरावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊतांच्या या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वाघ यांनी संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत एक सवाल केलाय.
ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं. मग, राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.
ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं @rautsanjay61 यांच म्हणणं आहे
मग
महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं
मग
राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ?? pic.twitter.com/53HPtOoBOi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 21, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला होता.
संबित पात्रा यांचाही पलटवार
ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं महाराष्ट्र सरकारनेच कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे संजय राऊतांना कदाचित सत्य माहीत नसावं, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.
संजय राऊत यांना कदाचित सत्य माहीत नसावे. ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं त्यांच्याच सरकारने कोर्टात सांगितलं. या प्रकरणी काही लोक कोर्टात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला ही माहिती दिली होती. ऑक्जिनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा केंद्र सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचं खुद्द मुंबई महापालिकाचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सुद्धा एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे, असं पात्रा म्हणाले.
ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष अजून राजकारणच करत आहे. काल केंद्र सरकारने कोरोनाबाबतचं सादरीकरण केलं. त्या बैठकीला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. बैठकीला यायचं नाही आणि टीका करायचं हे योग्य नाही, असं ते म्हणाले. कोणत्याही राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झालेले नाहीत. २७ एप्रिल रोजी कोर्टात एक प्रकरण होतं. त्यावेळी आम आदमी पार्टीने कोर्टात राज्यात २१ मृत्यू झाल्याचं सांगितलं. पण हे मृत्यू कोमोरबिडिटीमुळे झाल्याचं आपने कोर्टात म्हटलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
एकाही राज्याने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे आकडे केंद्राल दिलेले नाहीत. राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचंही कोणत्याही राज्याने म्हटलेलं नाही. महामारी असो, व्हॅक्सिनचा विषय असो प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एवढंच काम राहुल गांधी करत आहेत. एक ट्विटर ट्रोल म्हणून राहुल गांधी हे काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.




