नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक येथील स्व. रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन, नाशिक बार असाोसिएशन, नाशिक जिल्हा क्रिकेट व स्पोर्ट्स असोसिएशन, अमरावती बार असोसिएशन आणि महाराष्ट्र अॅडव्होकेट क्रिकेट अॅड स्पोर्ट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन दि. २० ते ३१ डिसेंबर अखेर नाशिकमध्ये करण्यात आल्याची माहिती आयोजक अॅड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता संदीप युनिव्हर्सिटी, महिरावणी येथे पार पडणार असून माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर व करसन घावरी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. महेंद्र नेर्लीकर, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे, कोल्हापूर खंडपीठाचे न्या. शिवकुमार दिघे, जिल्हा व सत्र न्यायालय संगमनेरचे न्यायाधीश दिलीप घुमरे, संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन संदीप झा, अॅड. शैलेश भावसार, चंदभान थुल, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड. अशोक येंडे, माजी न्यायाधीश वसंत पाटील, अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, अॅड. पारिजात पांडे, अॅड. विकास जोशी, अॅड. शैलेंद्र तिवारी, अॅड. राजेंद्र घुमरे, अॅड. इंद्रभान रायते, अॅड. सुधाकर दामले, अॅड. पांडुरंग तिदमे, यांच्या विशेष उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अॅड. जगदाळे यांनी दिली.
यंदा या राज्यस्तरीय क्रिकेट कुंभ पर्वामध्ये सहभागी होण्याकरीता राज्यभरातील वकिलांचे ११४ संघ सहभागी होत असून नाशिक व परिसरातील २८ मैदानांवर या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





