स्पोर्ट्स

केएल राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी; पंजाबचा गतविजेत्या मुंबईवर ९ गडी राखून विजय

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून दारुण पराभव केला. पंजाबचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला. मुंबईने पंजाबला विजयासाठी १३२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबने १ गडी गमावून १७.४ षटकांत पूर्ण केलं. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ६०, ख्रिस गेलने नाबाद ४३ धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहरने एकमेव गडी बाद केला.

पंजाबच्या डावाची सुरूवात राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा केल्या. मयांक २५ धावांवर बाद झाला. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने विजयी खेळी साकारली. केएलने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ११५.३८ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ६० धावांची खेळी केली. कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची नाबाद भागीदारी केली. या जोडीने पंजाबला विजय मिळवून दिला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले आणि या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १३१ धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक हुड्डाने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला ३ धावांवर माघारी पाठवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशन ६ धावांवर बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. पहिल्या १० षटकात मुंबईला फक्त ४८ धावा करता आल्या.
धावसंख्या कमी असली तरी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १००च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. मधळ्या फळीतील हार्दिक पंड्या पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो ४ चेंडूत एक धाव करून बाद झाला. अखेरच्या ४ षटकात मुंबईला फक्त २६ धावा करता आल्या.

या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गुणतक्यातील स्थानावर कोणताही फरक पडलेला नाही. ते चौथ्या स्थानावर कायम आहेत. पाच सामन्यातील त्यांचा हा तिसरा पराभव आहे. पंजाबला मात्र या विजयाचा मोठा फायदा झाला आहे. त्यांनी सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button