भारतीय तपास यंत्रणांकडून माझ्या अपहरणाचा प्रयत्न : मेहुल चोक्सी

अँटिग्वा – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधील हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर आता अँटिग्वामध्ये पोहोचला आहे. दरम्यान, अँटिग्वा येथे पोहोचताच चोक्सीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप मेहुल चोक्सीने केला आहे.
डॉमिनिकामधून जामिनावर सुटका झाल्यानंतर मेहुल चोक्सी म्हणाला की, मी आज घरी परतलो आहे. मात्र गेल्या काही दिवसांत माझा जो छळ झाला त्याचे ओरखडे माझ्या मनावर कायमचे गोंदले गेले आहेत. मला कल्पनाही नव्हती की, माझा सर्व व्यवसाय बंद करून माझ्या सर्व मालमत्तेवर जप्ती आणल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा माझ्या अपहरणाचा प्रयत्न करतील.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला होत. भारतातून पळून गेलेला आणि सध्या डॉमिनिकामध्ये अटकेता असलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी मेहुल चोक्सी याला देण्यात आली होती. त्यानंतर मेहुल चोक्सी आता पुन्हा अँटिग्वामध्ये दाखल झाला आहे. मेहुल चोक्सीवर पीएनबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता विचारात घेऊन अँटिग्वामध्ये फरार झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्या तो डॉमिनिका येथे पोहोचला होता. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली होती.




