Top Newsराजकारण

स्थानिक राजकारणात भांड्याला भांडं लागतं, समन्वयातून मार्ग काढू !

संजय राऊतांच्या इशाराऱ्यानंतर जयंत पाटलांचे उत्तर

मुंबई : खेड पंचायत समितीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर आगपाखड करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दात राष्ट्रवादीला इशारा दिलाय. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटलांकडे लक्ष द्यावं, अन्यथा शिवसेना हा विषय सोडवायला समर्थ आहे, अशा शब्दात राऊतांनी दिलीप मोहिते-पाटलांवर आगपाखड केलीय. त्यावर स्थानिक राजकारणात ३ पक्ष असल्यामुळे भांड्याला भांड लागणारच. आम्ही समन्वयातून मार्ग काढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिलाय.

संजय राऊत यांच्या इशाऱ्याबाबत विचारलं असता, स्थानिक पातळीवर काही वाद झाला असेल तर समन्वयातून मार्ग काढू. कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक राजकारणात तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं, पण आम्ही चर्चेतून मार्ग काढू. संजय राऊत काय बोलले हे आपल्याला माहित नाही, असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलंय. लॉकडाऊन हटवण्याच्या गोंधळाबाबतही जयंत पाटील यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button