
दादरा नगर-हवेली : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दादरा नगर-हवेलीत बोलत होते.
अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे यांनीही आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाय. त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपांवर टीका केलीय.
नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे. ते स्पष्टपणे समोर येत आहे आहे. तपास अधिकाऱ्यांना टार्गेट करणे हे योग्य नाही. कारण, ते घटनात्मक पदावर आहेत. घटनात्मक पदावरचा माणूस सांगेल की मी याला जेलमध्ये टाकणार, कारवाई करणार, सर्टिफिकेट खोटे आहे. परत आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे. हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलीच केस टिकणार नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला तर तेही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.
एनसीबीचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? एनसीबी कारवाई कोणावर करते? त्यांची सर्व कारवाई ड्रग्सच्या प्रकरणात होते! मग असे म्हणायचे का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करीत आहात ? असे नाही ना म्हणता येत! मुळात त्यांचं दुःख आहे की जे छापे पडत आहेत आणि त्यातून जी माहिती बाहेर येत आहे, यातून हे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.
शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.