ठाकरे सरकारमधील लोक तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का? : नरेंद्र पाटील

कराड : राज्यातील ३० हजार युवा उद्योजकांना या योजनेतून २०० कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला ८ कोटी, तर दरवर्षी ९६ कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय.
महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २०२१ – २०२२ सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिलीय. ते कराडमध्ये बोलत होते.




