श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा; शिखर धवन कर्णधार

मुंबई : भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, तर दुसरा एक संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात विराट-रोहित-बुमराह-शमी असे दिग्गज खेळाडू नसतील. या दिग्गजांशिवाय भारताला श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. काही अनुभवी, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.
देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार, असं ट्विट करत त्याने बीसीसीआय आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच तो भारताची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठं अपेक्षांचं ओझं असेल.
https://twitter.com/SDhawan25/status/1403270265463840771
शिखर धवनने भारताकडून ३४ कसोटी सामने, १४५ एकदिवसीय सामने आणि ६५ टी -२० सामने खेळले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडलिरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे धवनला श्रीलंका दौर्यासाठी कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. धवनशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून संधी देण्यात आलीय.
टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना १३ जुलै रोजी, तर दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 16 आणि 18 जुलै रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया




