पहिल्या दिवशी टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसाखेर १ बाद २४ धावा
स्टोक्सच्या अर्धशतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला; पहिला डाव सर्वबाद २०५

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 24 धावा करुन 1 विकेट गमावली आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. पुजारा 15 तर रोहित 8 धावांवर नॉट आऊट आहेत. तर शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाने 1 विकेट गमावली. गिल भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं.
भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव पुन्हा गडगडला. अडखळत्या सुरुवातीनंतर बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला डॅन लॉरेन्स (४६) व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलने ४ विकेट, तर अश्विनने ३ विकेट घेतल्या. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिबली (२) आणि झॅक क्रॉली (९) यांना झटपट बाद केले. तर कर्णधार जो रूट (५) आणि जॉनी बेअरस्टो (२८) यांना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद ७८ अशी अवस्था होती.
स्टोक्स आणि ऑली पोप यांनी पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. स्टोक्सने १२१ चेंडू खेळून काढत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला वॉशिंग्टन सुंदरने पायचीत पकडत इंग्लंडला आणखी एक झटका दिला. यानंतर लॉरेन्सने एकाकी झुंज देत ४६ धावांची खेळी केली. परंतु, तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने इंग्लंडचा डाव २०५ धावांत गारद झाला.
मालिकेत टीम इंडिया आघाडीवर
या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतरच्या पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली. हा चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.