दोन-तीन दिवसांत कोरोनाचा संसर्ग आणखी फैलावण्याची भीती; शास्त्रज्ञांचा अंदाज
नवी दिल्ली: येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचेल, अशी भीती केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाने वर्तविली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान टिपेला पोहोचू शकतो. कोरोना शिगेला पोहोचण्याची वेळ आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर आली. कारण, कोरोनाचा संसर्ग अपेक्षेपेक्षा वेगाने फैलावला, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.
शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख एम. विद्यासगार यांनी यासंदर्भात माहिती दिली. आमच्या अंदाजानुसार, आगामी आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचेल. यापूर्वीच्या अंदाजानुसार ५ ते १० मे या काळात कोरोना शिगेला पोहोचेल, असा अहवाल शास्त्रज्ञांनी केंद्राकडे सादर केला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षित वेळेपेक्षा आधी शिगेला पोहोचल्याचे आता स्पष्ट होत आहे.
गेल्या नऊ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर शुक्रवारी हा आकडा ३.८६ लाख या उच्चांकी पातळीला जाऊन पोहोचला होता. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशात आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. परिणामी अनेकांना बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांसाठी झगडावे लागत आहे.
देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.