स्पोर्ट्स

थरारक सामन्यात भारताचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय; एकदिवसीय मालिकाही जिंकली

इंग्लंडच्या सॅम करनची झुंजार ९५ धावांची खेळी

पुणे : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd Odi) सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारताने 2-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराटसेनेने इंग्रजांना विजयासाठी 330 धावांचे आव्हा दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 95 धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मलानने अर्धशतक झळकावलं. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली. तसेच टी नटराजनने 1 विकेट मिळवली.

भारताने दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचीत केलं. जेसन रॉयने 6 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. जेसन रॉय बाद झाल्यानंतर लगेच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने जॉनी बेयरस्टोला पायचीत केलं. बेयरस्टो अवघ्या एक धावावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने जोस बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवले. बटलरने 18 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर मलान आणि लिविंग्स्टोन यांनी डाव सावरला. दोघांनी संयमी खेळी सुरु ठेवली. पण शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर लिविंग्स्टोनही झेलबाद झाला. त्याने 31 चेडूत 36 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे.

लिविंग्स्टोन नंतर शार्दूलने मलानचा देखील बळी घेतला. मलानने 50 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये सहा चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मोईन अलीने सॅम करनच्या मदतीने डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने एकदम अचूकपणे त्याचा झेल टिपल्याने तो बाद झाला. मोईनने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 25 चेंडूत 29 धावा केल्या.

मोईननंतर सॅम करनने आदिल रशीदच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली. दोघांनी अर्धशतकापेक्षाही जास्त धावांची भागीदारी केली. दरम्यान, विराटने 40 वी ओव्हर शार्दुल ठाकूरला दिली. शार्दुलने विराटचा विश्वास खरा ठरवला. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. पण विराट आणि चेंडू यांच्यातील अंतर बरेच लांब होतं. पण विराट आपल्या नेहमीच्या शैलीत हवेत झेपावला. चेंडूवर अचूक नजर ठेवत कॅच पकडला. यासह इंग्लंडला आठवा धक्का बसला. रशीदने 22 चेंडूत 19 धावा केल्या.

सॅम करनच्या नाबाद 95 धावा

रशीद बाद झाल्यानंततर वूड आणि सॅम करन यांनी पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. करनने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. अखेर 14 धावांवर बाद झाला. मात्र, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोचक ठरला. सॅम करनने शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद 95 धावा केल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या ओपनिंग जोडीने 103 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान धवनने अर्धशतक पूर्ण केलं. भारताची धावसंख्या 103 असताना रोहित शर्मा 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा 117 स्कोअर असताना गब्बर शिखर धवन आऊट झाला. धवनला आदिल रशीदने आपल्या बोलिंगवर कॅच आऊट केलं. धवनने 56 चेंडूत 10 चौकारांसह 67 रन्स केल्या.

धवननंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. मात्र विराट फार वेळ मैदानात टिकला नाही. आदिल रशीदने पुन्हा एकदा विराटला बाद केलं. रशीदने विराटचा त्रिफळा उडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रशीदने विराटला बाद करण्याची ही नववी वेळ ठरली. विराट बाद झाल्याने भारताची स्थिती 121-3 अशी झाली. विराटनंतर केएल राहुल मैदानात आला. पंत आणि राहुलने टीम इंडियाची डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो फार यशस्वी ठरला नाही. 157 धावसंख्या असताना केएल 7 धावांवर बाद झाला.

पंत-हार्दिकची फटकेबाजी

केएल बाद झाल्याने भारत अडचणीत सापडला होता. पण पंत आणि हार्दिक या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी मैदानातील प्रत्येक दिशेला फटके मारले. दरम्यान पंतने अर्धशतक झळकावलं. यानंतरही दोघे इंग्लंडच्या फलंदाजांना चोपत होते. मात्र ही सेट जोडी सॅम करनने फोडली. सॅमने पंतला जॉस बटलरच्या हाती कॅच आऊट केलं. पंतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावांची खेळी केली. पंत आणि पंड्याने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची वेगवान आणि महत्वपूर्ण भागीदारी केली.

शार्दूलची आक्रमक खेळी

हार्दिक पांड्या नंतर शार्दूल ठाकूरने आक्रमक फलंदाजी केली. पण तो झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यामध्ये 6 षटके आणि 3 चौकारांचा समावेश आहे. शार्दूलला कृणाल पांड्याने संयमी साथ दिली. मात्र, शार्दूलनंतर कृणालही बाद झाला. त्याने 34 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर काही धावांच्या अंतरावर भारताचे इतर फलंदाज बाद झाले. भारताने 48.2 षटकात 329 धावा केल्या.

विराटचं अनोखं ‘द्विशतक’
इंग्लंड विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा विराटचा कर्णधार म्हणून एकूण 200 वा सामना होता. विराट कर्णधार म्हणून 200 सामन्यात आपल्या संघाचं नेतृत्व करणारा तिसरा भारतीय तर एकूण 8 वा कर्णधार ठरला आहे. आतापर्यंत महेंद्रसिंह धोनी, रिकी पॉन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग, ग्रॅमी स्मिथ, एलेन बॉर्डर, अर्जुना रणतुंगा, मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा पराक्रम केला होता. तर विराट 8 वा कॅप्टन ठरला आहे. विराटने आपल्या 200 सामन्यांच्या (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) नेतृत्वात एकूण 128 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 55 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर 3 मॅच या बरोबरीत सुटल्या आहेत.

फिरकीटपटूंसमोर विराट फेल!

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने विराटला शिकार बनवलं. त्यामुळे विराट आजच्या सामन्यात फारसा जलवा दाखवू शकला नाही. विशेष म्हणजे मोईनची आजची विकेट पकडली तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आतापर्यंत 9 वेळा विराटचा बाद केलंय. त्याचबरोबर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशीद याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटचा बळी घेतला होता. त्या सामन्यात तर विराट फॉर्ममध्ये होता. त्याने 77 धावा ठोकल्या होत्या. पण अखेर राशिदने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत विराटची विकेट घेतली. आदिल राशीदने आतापर्यंत 9 वेळा विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. कोहलीसारख्या वर्ल्ड क्लास फलंदाजाला सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करण्याचा पराक्रम आदिल राशीदने गाजवला आहे. त्यापाठोपाठ ग्रॅमी स्वानने 8 वेळा, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पा आणि नॅथन लायनने प्रत्येकी 7 वेळा कोहलीला बाद केलं आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने विराट कोहलीला आतापर्यंत 10 वेळा बाद केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button