
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत आणखी एक गौप्यस्फोट
समीर वानखेडे यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले नवाब मलिक ठराविक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे.
नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट करून समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून माहिती समोर आणली आहे. या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना अडचणीत आणले आहे. काल नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित कले होते. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने आयआरएसची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं ट्विट करत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने नोकरी मिळवल्याचा मलिक यांनी म्हटलं आहे.
समीर आणि डॉ. शबाना कुरेशी निकाहाचा फोटो मलिकांकडून ट्विट
Photo of a Sweet Couple
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो प्रदर्शित केला आहे, जो डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत निकाह केल्याचा आहे. म्हणजेच मलिक वारंवार हेच स्पष्ट करु इच्छित आहे की समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत.