मुक्तपीठ

अशिक्षित ओझे असतील, तर शिक्षित संकट !

- पुरुषोत्तम आवारे पाटील

काहीही करून देशाची सत्ता मिळविण्यात यशस्वी झाल्यावर गुंड, पुंड अन् तडीपार लोक आपले मूळ रंग कसे दाखवायला लागतात याचे गृहमंत्री अमित शहा हे उत्तम उदाहरण आहेत. मुळात अमित शहा यांचे शिक्षण किती झाले असावे याबाबत संभ्रम असताना काल त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना जे अकलेचे तारे तोडले ते भयंकर आहेत. *अशिक्षित नागरिक या देशावरील ओझे असल्याचा मोठा शोध त्यांनी लावला आहे*. या देशातील महान नेत्यांनी आजवर ज्यांना प्रामाणिक मानून त्यांच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या त्याच अडाणी लोकांना देशावरील ओझे म्हणण्या इतपत शहा यांनी मजल मारली आहे. अमित शहा पुढे म्हणतात, अशिक्षित लोक कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत. राज्यघटनेने आपल्याला कोणती कर्तव्ये सांगितली आहेत याची काहीही कल्पना या लोकांना नसते. *गृहमंत्री अमित शहा हे तेच गृहस्थ आहेत, ज्यांच्यावर खून, दरोडा, अपहरण असे गुन्हे दाखल असून, तडीपार शिक्का लावून मिरवत आहेत*. काही वर्षापर्यंत ज्यांना संविधान म्हणजे नेमके काय असते याचीही जाण नव्हती, ते आता देशाला अक्कल वाटायला लागले आहेत हे फार गंभीर आहे. अशिक्षित लोक उत्तम नागरिक बनू शकत नाहीत हे जणू भाजपने पक्के ठरवून टाकले आहे असे दिसते. आजही आपल्या देशात अशिक्षित समूह मोठा आहे. त्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी सरकारची असताना ती झटकून शहाणा नेमके काय करायचे आहे याचे या वाह्यात वक्तव्यातून संकेत मिळतात.

केंद्रात सत्ता दुसयांदा मिळाल्यावर या देशाचा सातबारा जणू आपल्या नावावर झाल्यासारखे भाजपचे शीर्षस्थ नेते वागायला लागले आहेत. हे सहज घडत नाही. भाजप किंवा त्यांचे मोठे नेते काहीही सहज करीत नाहीत किंवा त्यांची जिभही घसरत नाही. ते कोणतेही विधान अतिशय विचारपूर्वक करीत असतात. आधी त्यांची कार्यशाळा होते. कोणता मुद्दा सहज फेकायचा आणि त्याचे होणारे परिणाम मोजायचे हे ठरलेले असते. त्यामुळे गरीब, अशिक्षित लोक भाजपला ओझे वाटणे स्वाभाविक आहे. एकदा का गरीब, अशिक्षित लोकांना ओझे, कचरा ठरवले की त्यांची विल्हेवाट कशी लावायची याच्या योजना तयार करायला सरकार मोकळे असे कारस्थान यामागे असल्याचे लपून राहिले नाही.

या देशात ज्यांच्या पन्नास पिढ्या जन्मल्या, राबल्या त्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलण्यास ज्या सरकारला एनआरसी लागू करावा वाटतो त्याच सरकारला आता अठरापगड जातीतील, भटके विमुक्त, आदिवासी हे खरे संविधान रक्षक ओझे वाटायला लागणे यात नवल नाही. माणसा माणसातील ज्या मतभेदाना गोळवलकर गुरुजींनी सुरुवात केली होती, त्यावर अशा पद्धतीने कळस चढवण्याचे अपूर्ण कार्य हे भाजप सरकार करायला निघाले आहे. अमित शहा यांचे हे वक्तव्य त्याच साखळीतील पुढचा अध्याय समजायला हरकत नाही.खरंतर या देशाचा सत्यानाश जेवढा शिक्षित वर्गाने केला तेवढा अशिक्षित माणसाने केला नाही हे वास्तव आहे.

शिक्षित व्यक्ती सर्वकाही मला समजते हा अहंकार दाखवत कधीच काही ऐकून घेत नसतो. अडाणी माणूस कायम आपल्याला काही कळत नाही हे लक्षात घेऊन नवे शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. भाजप ज्या भारतीय संस्कृतीच्या शपथा घेत असते त्या संस्कृतीचे महान पुरुष कोणत्या शाळेत गेले होते? त्यांनी कोणत्या पदव्या घेतल्या होत्या? हे पण एकदा भाजपने जाहीर करायला हवे. माणूस शिक्षित झाला असला तरी तो सुशिक्षित झाला असे आजही म्हणता येणार नाही. असे असताना अमित शहा कोणत्या तोंडाने गरीब, अशिक्षित लोकांना ओझे ठरवत आहेत हे तपासण्याची गरज आहे. भारतीय लोकांनी भाजपचा हा मनसुबा ओळखला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button