आरोग्य

होळी : रंग उधळा, पण सुरक्षित राहून

- डॉ. वंदना जैन, क्लिनिकल सर्व्हिसेस प्रमुख, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, मुंबई

होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्यासारख्या शहरी माणसांसाठी आपल्या आप्तेष्टांसोबत आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांसोबत हा रंगांचा सण साजरा करणे हे आनंद व्यक्त करण्याचे आणि अनुभवण्याचे अजून एक निमित्त असते. पण बदलत्या काळानुसार होळीचा चेहराही बदलला आहे. एके काळी हा सण फुले आणि नैसर्गिक घरगुती रंगांनी खेळला जायचा, त्या जागी आता चकाकणारे रासायनिक रंग आले, पाण्याचे फुगे आणि पाण्याच्या फॅन्सी पिचकाऱ्या आल्या आहेत. आणि सहाजिकच हे घटक घेऊन आले आहेत डोळ्यांसाठी इजा.

आनंदी होळीसाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स :
– पश्चातापापेक्षा प्रतिबंध हितकारक:

– धुळवड किंवा रंगपंचमी खेळल्यानंतर रंग सहज निघावे यासाठी कोल्ड क्रीमचा जाड थर तुमच्या डोळ्यांभोवती लावा. त्यामुळे जेव्हा तुम्ही नंतर डोळे धुता तेव्हा रंग सहज निघून जातो. पाण्याने रंग काढताना डोळे घट्ट झाकून ठेवा.

– तुम्ही कारने प्रवास करणार असाल तर खिडक्यांच्या काचा लावा. काही वेळा एखाद्या अनाहूताने मारलेला एखादा फुगा खिडकीतून येऊन डोळ्याला लागू शकतो.

– मुलांनाही नॉन-टॉक्सिक (घातक नसलेले) रंग वापरण्यास सांगा.
– तुमच्या डोळ्यांचा रंगीत पाण्यापासून बचाव करण्यासाठी गॉगल/संरक्षण चष्मा आठवणीने लावा.

डोळ्यांना इजा झाल्यास :

– तुमच्या डोळ्यात रंग गेला तर सामान्य तापमानाला असलेल्या भरपूर पाण्याने डोळे धुवा.
– डोळे लालसर होणे, वेदना होणे, जळजळ होणे किंवा प्रकाशाकडे पाहण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसत असतील तर नेत्रविकार तज्ज्ञाची भेट घ्या. डोळे चोळू किंवा डोळ्यांना मसाज करू नका
– डोळ्याला पाण्याचा फुगा लागला तर स्वच्छ कापडाने डोळा झाका आणि तत्काळ डॉक्टरची भेट घ्या

होळीच्या या कालावधीत नेत्रविकार तज्ज्ञांनाही डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. होळीदरम्यान होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या खालीलप्रमाणे :

– पारपटलावर ओरखडे निर्माण होणे (डोळ्याच्या बाहेरील घुमटावर ओरखडा)
– डोळ्यांमध्ये रसायनांमुळे जळजळ
– ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) (रसायनांबद्दल ॲलर्जी असल्यामुळे डोळ्यांच्या बाहेरील बाजूस असलेल्या पारदर्शक स्तराला सूज जेणे)
– डोळ्यावर फुगा फुटल्याने धक्का बसणे आणि डोळ्याच्या आतील बाजूस रक्तस्त्राव होणे, डोळ्याच्या भिंगाचे स्थान बदलणे, रेटिना निघणे (रेटिना हा डोळ्यातील फोटोसेन्सिटिव्ह स्तर विलग होणे) मॅक्युलर एडेमा (रेटिनाच्या मध्यभागाला सूज येणे)

यापैकी बऱ्याच इजा अशा आहेत, ज्यामुळे तात्पुरते अंधत्व येऊ शकते किंवा काही वेळा कायमस्वरुपी अंधत्वदेखील येऊ शकते.

डोळ्यात रंग गेले, हलकीशी जळजळ झाली आणि डोळे लालसर झाले तर डोळ्यावर पाणी मारल्यावर या समस्या निघून जातात. पण खूप जळजळ होत असेल, वेदना होत असतील आणि दृष्टीदोष निर्माण झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. अनेकांना असे वाटते की, कॉन्टॅक्ट लेन्सेस होळीसाठी सुरक्षित पर्याय आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, तुमच्या डोळ्यात जाणारा प्रत्येक रंग ते शोषून घेत असतात आणि तो एका ठिकाणी साकळतो. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचेच असतील तर डिस्पोसेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे आणि धुळवड किंवा रंगपंचमी खेळून झाल्यावर ते टाकून द्यावे. चष्मे वापरणाऱ्या व्यक्तींना तर खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांनी चष्मा घातला तरी चष्म्याच्या फ्रेमच्या खाचाखोचांमध्ये रंग अडकून बसतात. रिमलेस चष्मे सहज तुटू शकतात. त्यामुळे चष्मा घालणे शक्यतो टाळावे.

नैसर्गिक रंग हा सुरक्षित पर्याय आहे. बेसन आणि हळदीच्या मिश्रणाने पिवळा किंवा गुलमोहराने नारिंगी, पाण्यात भिजवलेल्या बिटाने गुलाबी रंग, लाल रंगासाठी जास्वंदाचा वापर केला तरी तेवढीच मजा येते! यंदाच्या होळीमध्ये तुमच्या डोळ्यांनाही रंगांचा सोहळा अनुभवू दे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button