
दृश्य पहिले
पावसाळ्यामुळे आधीच कुंद असलेले वातावरण कृष्णकुंज गडावर अधिकच कुंद भासत असते. चुलतराजे रात्रभर आपण इतिहास या विषयात खरोखरच इतके कच्चे होतो का की, कोणाही येऱ्यागबाळ्याने यावे आणि आपल्याला अक्कल शिकवावी आणि आपण दादांंच नेमकं कोणतं साहित्य वाचायला हवं म्हणजे आपल्याला जातीयवाद या विषयावर अधिकारावाणीने काही बोलता येईल याचा विचार करून थकलेले असतात. रात्रभर त्यांचा डोळ्याला डोळा लागलेला नसतो. घड्याळाकडे पाहिलं तर एव्हाना सूर्य कासराभर तरी वर यायला हवा होता. त्याचा तर अजून नभात कुठेच पत्ता नसतो.चुलतराजे अस्वस्थ होतात. सदरेवर येऊन ते ताबडतोब आपला एक सांडणीस्वार बांद्र्याच्या मातोश्री गडाकडे रवाना करून तेथील हालहवाल माहीत करून घेण्याचा हुकूम सोडतात.आपल्या शयनगृहात येऊन राजे आरशात आपले रूप न्याहळू लागतात. आरशात दिसणारा आपला लालबुंद , थोडा सुजलेला पण राजबिंडा चेहरा पाहून राजे परत अस्वस्थ होतात.
चुलतराजे – (मनातल्या मनात) आपला चेहरा लालबुंद दिसावा, राजबिंडा दिसावा यात काही नवल नाही, पण आपला चेहरा सुजलेला का दिसावा ? आपला चेहरा सुजला आणि तोही आपल्या अनुमती शिवाय ? याचा अर्थ आपल्या गडावर काही गोष्टी आपल्या अनुमती शिवाय घडू लागलेल्या आहेत, त्याही दस्तुरखुद्द आपल्याच बाबतीत ! गडावरची आपली पकड ढिली पडत चालली आहे की काय ? अति झोपेने तोंडावर सूज येते हे माहीत होते, पण अति झोपणे तर आपण कधीचेच सोडले आहे. मागे मोठ्या साहेबांनी ‘ सकाळी लवकर उठत चला.’ असा सल्ला दिल्यानंतर आपण मानवी आवाज काढून उठविणारे गजराचे घड्याळ आणले होते आणि तेव्हापासून आपण भल्या पहाटे आठ वाजेचा गजर लावून नवाच्या आत मंचकावरून खालीसुद्धा उतरलेलो असतो . तरी चेहऱ्यावर ही सूज कसली ? वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. आपले सैनिक एखाद्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवत असतील तेव्हा त्याचा चेहरासुद्धा असाच सुजत असेल का ? जाऊ दे. मरू दे.
थोड्याचवेळात मातोश्री गडावर गेलेला सांडणीस्वार परत आल्याची वर्दी देण्यात येते आणि राजे परत सदरेवर हजर होतात.
चुलतराजे – काय खबरबात आणलीस रे तिकडून ?
सांडणीस्वार – ( मुजरा करत) राजाधिराज चुलतराजेंचा विजय असो. राजे, मातोश्री गडावर सूर्य आपल्या पूर्ण तेजाने तळपतोय. आजूबाजूला दोन चार काळे ढग आहेत, पण त्यांची त्या ‘आदित्य’ नारायणाला किंचितही पर्वा नाही. सर्व वातावरण कसं तेजोमय , प्रसन्न आहे.त्यामानाने आपल्याकडे अजून उजडायचं बाकी आहे की, संध्याकाळ झाली आहे तेच कळत नाही ! असं वाटत होतं की तिथेच राहून जावं.
चुलतराजे – ( ओरडून) चूप . याला साखळदंडाने बांधून टाका रे तिकडे कोठडीत.
आज्ञा देऊन चुलतराजे स्नानादी कर्मे उरकण्यासाठी निघून जातात.
दृश्य दुसरे
स्नानादी कर्मे आटोपून चुलतराजे आपल्या दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांच्याच पाचवी ते दहावीच्या गुणपत्रिका विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. चुलतराजे एकवार त्या सर्व गुणपत्रिकांवर नजर फिरवितात आणि शेजारीच हात बांधून उभ्या असलेल्या सेवकाला फर्मान सोडतात –
चुलतराजे – ( दरडावत) चार माणसांना चार दिशांना पिटाळ आणि आमच्या दादांचं जितकं काही साहित्य जमा करता येईल तितकं जमा करून आणायला सांग. ( मनातल्या मनात) सालं , मदत करायची बोंब. जाहीरपणे नको ते सल्ले देऊन नसती कामं करायला लावतात.
चुलतराजे आपल्या सगळ्या गुणपत्रिका क्रमाने लावतात आणि त्यातल्या इतिहासाच्या गुणांवर स्वहस्ते लाल शाईने वर्तुळं काढतात. मग शांतपणे त्यांची बेरीज करून सरासरी काढतात. त्यांच्या चेहेऱ्यावर एकाचवेळी आनंद, समाधान आणि उद्वेग अशा तिन्ही भावना उमटतात.
चुलतराजे – ( पुटपुटत ) मूर्ख साले , इतिहासात इतके चांगले मार्क्स यांच्या बापाला तरी मिळाले असतील का कधी ? मला म्हणतात की, पुरंदरेंच्या इतिहासाशिवाय दुसरा इतिहास माहीत नाही म्हणून. अरे , मी काय आता इतिहास विषय घेऊन एम.ए. करू की आमच्या दादांच्या साहित्यावर पीएचडी करू ?




