Top Newsशिक्षण

बारावीच्या परीक्षेत ‘विक्रमी’ ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि. ३) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के वाणिज्य शाखेचा ९९.९१ टक्के तर कला शाखेचा ९९.८३ टक्के लागला. एमसीव्हीसीमध्ये ९८.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ४६ तर १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. कोकणचा सर्वाधिक ९९.८१ टक्के आणि औरंगाबाद ९९.३४ टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्के वाढ झाली आहे.

दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीच्या निकालात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पाच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी,अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहील, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावी निकालावर आक्षेप नोंदवता येणार

राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्तरावरून संबंधित तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे, असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या बारावीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.परीक्षेचा निकाल सुधारित मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी विभागीय मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण काण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहसचिव प्रिया शिंदे पुणे विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणार आहेत.

सर्व वेबसाईटस व्यवस्थित सुरु

बारावीच्या निकालाच्या निमित्तानं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, मागच्या वेळचा अनुभव बघता आपण पूर्ण तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही पाच लिंक देत आहोत. तांत्रिक लोकांशी चर्चा करुन पूर्ण काळजी घेत आहोत. बारावीच्या निकालाच्या वेळी व्यवस्थापन करण्यास बोर्डाला सांगितलं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं. इ. १० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ. ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय मिळालेले गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button