सोन्याच्या दरात आठवड्यापासून घसरण सुरूच

मुंबई : आठवडाभरात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झालेली आहे. सोनं जवळपास ह्या आठवड्यात 1460 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आगामी काही काळात हे दर आणखी खाली जातील असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या आठवडाभरात सोन्याचे भाव 1460 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पहिल्यांदाच सोनं प्रती तोळा 45 हजाराच्या खाली आलं आहे. गेल्या दहा महिन्यातला हा सोन्याच्या दराचा निचांक मानता जातो आहे. सोनं 24 कॅरेट असो की 14 कॅरेट. स्वस्त झाले आहेत. सध्या सोन्याचा भाव 44 हजार 500 रुपये इतका आहे तर चांदी प्रती किलो 65 हजार रुपये आहे. केंद्र सरकारनं अडीच टक्क्याची इम्पोर्ट ड्युटी कमी केली आणि सोनं स्वस्त व्हायला लागलं. गेल्या काही काळात सोनं हे 12 हजार रुपयांनी कमी झालेलं आहे. ते 56 हजार रुपयाच्या वर गेलेलं होतं. आगामी काळात हे दर आणखी कमी होत 42 हजार रुपये प्रती तोळापर्यंत जातील असा अंदाज बाजारातले जाणकार व्यक्त करत आहेत.
आठवड्यातले पाच दिवस असे आहेत ज्यावेळेस सोनं आणि चांदी स्वस्त झालं आहे. 1 ते 6 मार्च दरम्यान सोनं जवळपास दीड हजारानं स्वस्त झालं तर चांदी सव्वा तीन हजार रुपयानं.लग्नसराईचे दिवस सुरु झालेले आहेत त्यामुळे सोने खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. आगामी काही काळातही हे दर आणखी कमी होतील पण तोपर्यंत लग्नाची तारीख निघून गेलेली असेल. त्यामुळे सोनं खरेदी करायचं असेल तर आता ते करु शकता. गुंतवणुकीसाठी म्हणूनही सोन्याचा विचार करु शकता असं जाणकार सांगत आहेत.