राजकारण

परमेश्वर सर्वांचाच हिशेब करतो : चंद्रकांत पाटील

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर भाजपचा टोला

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरासह अन्य काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं या कारवाईच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आरोपांस उत्तर दिलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने शेवटी एफआयआर दाखल केलाच. मुंबई नागपूर घरासह दहा ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करत आहे. यातून जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल,’ असं पाटील म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता, ‘कुठल्याही विषयावर भाष्य करण्याची हसन मुश्रीफांना घाई असते. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार होणाऱ्या सीबीआय कारवाईमध्ये भाजपचा कट कसा?’, असा प्रश्न त्यांनी केला. आज काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे, असा बोचरा टोलाही त्यांनी हाणला.

अनिल परब यांची चौकशी करा

एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल परब आणि संजय घोडावत यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.

संजय राऊतांच्या चौकशीची मागणी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना खडसावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button