सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडून अंत्यविधी पार पडला. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. महिला पोलिसांनी सिंधुताईंना ही सलामी दिली आहे. यावेळी ममता सपकाळ यांच्या हाती भारताचा तिरंगा सुपूर्द करण्यात आला आहे. यानंतर सिंधुताई यांच्या पार्थिव महानुभव पंथाप्रमाणे दफन करण्यात आला. सिंधुताईंनी स्थापन केलेल्या सन्मती बाल निकेतनमध्ये सिंधुताईंच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. अंत्यदर्शनासाठी आलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले तर अनेकजणी हुंकदे देत रडत होत्या.
सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज सकाळी ९ ते १२ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मांजरीच्या बाल सदन संस्थेत ठेवण्यात आले होते.
यावेळी पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली पोरं माईंच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात दाखल झाली आहेत. माईंना पाहून या अनाथ लेकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. अनाथ लेकरांना माईंच्या रुपाने खऱ्या आईची माया मिळाली होती. मात्र माईंच्या अचानक जाण्याने या लेकारांवरील मायेचं छत्र हरवलं आहे. माईंच्या अंत्यदर्शनासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी, हितचिंतकांनी गर्दी केल्याचं दिसून आले.