मुंबई : आमदारकीपेक्षा मुलांचा सहवास श्रेष्ठ असे कायम म्हणणाऱ्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत राहिलेल्या माजी शिक्षक आमदार आणि राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई कार्याध्यक्षा संजीवनी रायकर यांचे आज सकाळी ९ च्या सुमारास निधन झाले. संपूर्ण आयुष्य शिक्षण व शिक्षक चळवळीसाठी खर्ची घातलेल्या संजीवनीताईंनी मुंबईच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
१९८८ साली शिक्षक मतदार संघाची पहिली निवडणूक झाल्यानंतर ३ वेळा शिक्षक आमदार म्हणून संजीवनी रायकर निवडून आल्या होत्या. वात्सल्य या अनाथ मुलांच्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. १९५३ मध्ये बालमोहन विद्यामंदिर येथे त्यांनी आपली पहिली नोकरी सुरू केली आणि त्यानंतर त्या बालमोहनमधील सगळ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या. त्यानंतरही महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून संघटनात्मक काम सुरूच ठेवले, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ याच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.
शिक्षक परिषद स्थापना व वाढ विकास यामध्ये संजीवनी रायकर यांचा सिंहाचा वाटा होता विधान परिषदेत उल्लेखनीय कार्य केले. त्याचबरोबर, केवळ मुंबई विभागाच्या नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रापील शिक्षकांचे शेकडो प्रश्न संजीवनी ताईंनी मार्गी लावल्याचे प्रतिक्रिया राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.