आरोग्य

भांडुपमधील आगप्रकरणी संचालकासह ८ जणांवर गुन्हा

मुख्यमंत्र्यांचे १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश; मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये

मुंबई : भांडुप (प.) येथील ड्रिम मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिराने भीषण आग लागल्याची घटना घडली. याच मॉलमध्ये असलेल्या तिसर्‍या मजल्यावरील सनराईज रुग्णालयाला या आगीची मोठी झळ बसली. आगीच्या धुरामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्‍या ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आता मुंबई महापालिकेने येत्या १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. भांडुपच्या ड्रिम मॉलला ओसी नसल्याचे देखील समोर आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. जी तात्पुरती रुग्णालये आहेत ,त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं, मात्र तरी देखील ऑडिट करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर घटनेप्रकरणी आरोपींवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दुर्घटनेची प्राथमिक चौकशी करता ड्रिम मॉलचे संचालक, प्रशासकिय अधिकारी आणि प्रशासक यांनी मॉलमध्ये आणि सनराईज रुग्णालयात सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. रुग्णालयामध्ये सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे, सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी करणे. सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक सदर खबरदारी घेतली नसल्याने यात ११ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी ड्रिम मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान, निकिता अमितसिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान, दिपक शिर्के आणि व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्कळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभाराचे १२ बळी, भाजपचा आरोप

भांडूप येथील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीवरुन विरोधी पक्ष भाजपने सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहे. ठाकरे सरकाच्या हलगर्जीमुळेच पुन्हा १२ बळी गेले आहेत. असा आरोप भाजपने केला आहे. या मॉलमध्ये रुग्णालय कोणत्याही अटींची पूर्तता न करता उभारण्यात आले होते. मॉलमध्ये अग्निसुरक्षा उपस्थित नसताना मॉलमध्ये रुग्णालय करण्याची परवानगी कशी देण्यात आली यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले आहे.

रुग्णांची अक्षम्य हेळसांड सुरू असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांमध्ये होणारी वाढही धडकी भरवणारी आहे. देशातल्या नव्या रुग्णांपैकी सुमारे ६० टक्के महाराष्ट्रतले आहेत. ही नामुष्की आणणारं ठाकरे सरकार कोरोना हाताळण्यात संपूर्ण अपयशी ठरल्याचा आणखी काय पुरावा हवा? कोरोना महामारिच्या लढाईत महाविकास आघाडीला अपयश आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button