राजकारण

मुंबईत कोणता बाबा तयार झाला आहे?; फडणवीस विधासनभेत आक्रमक

मुंबई : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा मुद्दा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. यावेळी देवेंद्र पडणवीस चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. अधिवेशन सुरु असताना गावगुंडांमध्ये फेसबुक लाइव्ह करुन धमकी देण्याची हिंमत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. याशिवाय, फडणवीस यांनी श्रीरामपूरमध्ये अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याचं सांगत पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवरुन गृहखात्यावर टीकेची तोफ डागली.

सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामपूरच्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरन यांच्या मृत्यूचा मुद्दा देखील मांडला. “मी परवा सभागृहात बोलताना श्रीरामपूरच्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरन यांचं अपहरण करण्यात आलं असून गावाने एक लाख रुपये जमा करुन त्यांना शोधा अशी विनंती केली आहे. काल त्या गौतम हिरन यांचा मृतदेह सापडला आहे. गावात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आम्ही सातत्याने पोलिसांना माहिती देत होतो, पण त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गृहमंत्र्यांनी आज दिवसभारत केव्हाही यासंदर्भात माहिती घेऊन निवेदन करावं. तक्रार केली असताना, रितसर माहिती दिली असताना पोलीस कारवाई का करु शकले नाहीत? यासंदर्भात माहिती देऊन पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी पुढे आमदार राजेंद्र राऊत यांनी देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा मुद्दा देखील उपस्थित केला. “बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्हवरुन धमकी देण्यात आली आहे. कोणीतरी नंदू उर्फ बाबा चव्हाण नावाचं गुंड आहे. स्वत: ला मुंबई बाबा म्हणतो. मुंबई बाबा नावाच्या गुंडाने सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा उल्लेख करत आणि त्याच्या केसाला धक्का लागला तर राजेंद्र राऊत यांचे हात पाय मोडून टाकू, अशी धमकी दिली आहे. पुढे तो म्हणतोय की, राजेंद्र राऊत तुम्ही संरक्षण घेतलं असलं तरी पोलिसांमध्ये आमचे लोक आहेत. गावगुंड अधिवेशन सुरु असताना फेसबुक लाईव्ह करुन धमकी देण्याची हिंमत दाखवत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही. मुंबईत असा कोणता बाबा तयार झाला आहे जो स्वत:ला एवढा मोठा गुंड समजतो. आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे आणि राजेंद्र राऊत यांना संरक्षण दिलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button