
नाशिक : हिरवांकुर फाउंडेशनच्या Hirwankur Foundation वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे World Environment Day औचित्य साधून एका अनोख्या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. वातावरणाचा दिवसेंदिवस बिघडत चाललेला आलेख, जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात होत असलेले हनन तसेच कमी होत चाललेला भूगर्भातील पाण्याचा साठा अशा चिंताजनक आव्हानातून संपूर्ण मानव जातीच्या बचावाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा न्यायाधीश २ व अति. सत्र न्यायाधीश एन. व्ही. जीवने यांनी काढले.
विख्यात विधिज्ञ अविनाश भिडे यांच्या अनोख्या संकल्पनेला साद घालत प्रत्येकाने स्वच्छ व हरित पर्यावरणासाठी कार्य करत कमीत कमी २० वृक्ष लावून त्यांचे संगोपन करायला हवे, असा संदेश जिल्हा न्यायाधीश ५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पि. वि. घुले यांनी युवा वर्गाला दिला.
निसर्गावर आघात करणाऱ्या समस्यांवर समाधान शोधण्यासाठी नाशिक येथील ‘हिरवांकुर’च्या टीमद्वारे विद्यार्थीदशेतच ‘हरघर किसान’ Har Ghar Kisan ही संकल्पना जोमाने सुरू आहे. यामध्ये प्रत्येक शाळेला पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त माहिती असलेली मार्गदर्शिका, सुमारे ८०० ते १००० दुर्मिळ होत असलेल्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांच्या बिया व घरच्या घरी कंपोस्ट खत बनवता यावे यासाठी बॅक्टेरियल कल्चर हे निःशुल्क देण्यात येते. या संकल्पनेत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये स्वतःची स्वतंत्र व अनोखी अशी रोपवाटिका बनवता येते. या माध्यमातून प्रात्यक्षिकासह हरितसंस्कार घडवण्यात येतात. आजपर्यंत टीम हिरवांकुर सुमारे २४०० शाळांपर्यंत पोहोचलेली असून सुमारे आठ लाख विद्यार्थी या संकल्पनेला जोडले गेले आहेत. घरोघरी जनजागृती होऊन कमी खर्च येणाऱ्या सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यातून खर्चात बचत झाल्यास बळीराजाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, हा या संकल्पनेचा मूळ उद्देश असल्याचे टीम हिरवांकुरचे संस्थापक अध्यक्ष निलयबाबू शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही संकल्पना व अभियान गतिशील व्हावे म्हणून टीमने समाजातील सुशिक्षित वर्गांना जोडण्याचे ठरवले. देशातील लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी मुख्य स्तंभ म्हणजे न्याय व सुव्यवस्था. जर या कार्यात जिल्ह्याचे सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणजेच कुटुंबप्रमुख असलेले न्यायाधीश, वकील संघ व सेवक वृंद हे उच्चशिक्षित व कायद्याचे ज्ञान असलेली व्यक्तिमत्वे सहभागी झाले तर आजची युवा पिढी त्यांचे अनुकरण करून आपला आदर्श निर्माण करतील.
संकल्पना…
स्वातंत्र्य दिनी म्हणजेच येत्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर न्यायालयाच्या आवारात वृक्षवंदना साकारली जाईल. त्यानंतर सर्व न्यायाधीश महोदय, विधीज्ञ परिवार व सेवक यांना प्रत्येकी एक भारतीय प्रजातीचे आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या वृक्षांचे रोप दत्तक देण्यात येईल. या रोपाचे पुढील वर्षभर आपण संगोपन करून त्याला सशक्त बनवायचे आहे. त्यानंतर न्यायालय आवारात अथवा योग्य ठिकाणी त्याचे वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच या वृक्षाला एक बारकोड निर्माण करून त्यामध्ये वृक्षाची संपूर्ण उपयुक्त माहिती, सोबत दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव अंकित करण्यात येईल. हे नाव २००, ३००, ५०० वर्षांपर्यंत वृक्षासोबत राहील. आपल्यासोबत आपण आपले नातेवाईक, मित्र, परिवार यांना सुद्धा सामील करू शकता. वृक्षाचे संगोपन मायेने व प्रेमाने व्हावे एवढीच एकमेव अट घालण्यात आली आहे, अशी माहिती टीम हिरवांकुरचे विश्वस्त मनोज पाटणी यांनी दिली.
ही संकल्पना उपस्थित न्यायाधीश व विधिज्ञ मंडळींना फार आवडली. पर्यावरण संवर्धनाचे ऋण फेडण्याची सुरुवात आपण लोकशाहीच्या महत्त्वाच्या आधारस्तंभ असलेल्या न्याय मंदिरातून केली आहे, त्याचे आम्ही सगळे स्वागत करतो. पृथ्वीवरील समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी एवढ्या निःस्वार्थ व प्रेरणादायी कार्यासाठी आमची निवड टीम हिरवांकुरने केली आहे. म्हणून आम्ही समस्त वकील संघ स्वेच्छेने सहभागी होऊ. कारण आमच्यापैकी बरीच मंडळी शेतकरी असून शेतीशी संलग्न आहेत. म्हणून आम्ही तन-मन-धनाने हिरवांकुरच्या या हरितक्रांतीत सोबत आहोत, अशा शब्दांत उपस्थितांनी स्वीकृती दर्शक पाठिंबा दिला.
या संकल्पनेचा प्रयोग गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा न्यायालय आवारात करण्यात आला होता. त्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश तसेच सर्व विधीज्ञ मंडळींना स्वतः संस्थेचे अध्यक्ष निलयबाबू शाह तसेच विश्वस्त, वरिष्ठ ॲड. अविनाश भिडे यांनी ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात साकारण्याबद्दल मागणी केली. अशाचप्रकारे जालना, धुळे, नगर, नंदुरबार, शहादा व जळगाव जिल्ह्यांतुन टीम हिरवांकुरला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २६ जानेवारी रोजी वरील सर्व ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली. अशाप्रकारे अनेक ठिकाणाहून स्वेच्छेने मागणी असल्याने आता येत्या १५ ऑगस्ट रोजी राज्य पातळीवर सुमारे ४२ ठिकाणी हिरवांकुरच्या टीम ही संकल्पना राबविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ३२ जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला.
एवढ्या ठिकाणी एकाच वेळेला आपल्या टीमचे आपण कसे नियोजन केले असे शाहजी यांना विचारल्यावर त्यांनी हसत मुखाने दोन ओळीत उत्तर दिले.
मैं अकेला ही चला था जानीबे मंजिल मगर,
लोग मिलते गए कारवा बनता गया।
वरील सर्व तालुक्यांमध्ये संकल्पना साकारताना सर्व बार असोसिएशनसोबत सामाजिक वनीकरण विभागाचे डी.एफ.ओ. गणेश रणदिवे तसेच महापालिकेचे उपयुक्त (उद्यान विभाग) विवेक भदाणे, किरण बोडके, सचिन देवरे आदींचे मोठे सहकार्य असल्याचे सांगण्यात आले.
‘हरघर किसान’च्या ‘वृक्ष दत्तक’ या अनोख्या शुभारंभाला टीम हिरवांकुरचे विश्वस्त व जिल्हाप्रमुख प्रशांत देवरे, योगेश पाटील, योगेश वारे, मधुर अग्रवाल, संजय पवार, श्रीमती राखी शहा, सौ अपर्णा दिवगी, सौ. टीना चौधरी, कु. दानवी लाकडे, कु. मंजिरी गावित, कु. लक्षिता पाटील, कु, श्रावणी पाटील व मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होती.