
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (‘एनआयए’) अटक केली आहे. ‘एनआयए’ने शर्मांच्या घरावर आज सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रदीप शर्मा यांची आठवी अटक आहे. प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी ताब्यात घेतल्यानंतर ‘एनआयए’ने त्यांना दुपारी अटक केली.
प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे. प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, यावेळी प्रदीप शर्मा यांच्या अटकेची शक्यता वर्तवली गेली असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. पण गुरुवारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएनं त्यांना अखेर अटक केली आहे.




