कोरोनावर परिणामकारक ‘स्पुटनिक-व्ही’ लस भारतात दाखल
हैदराबाद : भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. आजपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. परंतु, काही राज्यांमध्ये कोरोना लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, आता लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, कोरोनावर परिणामकारक असलेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ (Sputnik V) लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. रशियातून ‘स्पुटनिक-व्ही’ लसीची पहिली खेप आज हैदराबाद विमानतळावर पोहोचली.
‘स्पुटनिक-व्ही’ या लसीला ११ ऑगस्ट २०२० मध्ये अधिकृत मान्यता मिळाली होती आणि जगातील ही कोरोनावरील पहिलीच लस होती. ‘स्पुटनिक-व्ही’ लस कोरोनावर ९० टक्क्यांहूनही अधिक परिणामकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी या लसीबाबत फोनवर चर्चा केली होती. ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र, या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत.
सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. त्यामुळे ‘स्पुटनिक-व्ही’ भारतात उपलब्ध असलेली तिसरी लस झाली आहे. भारतात आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. परंतु, काही ठिकाणी पुरेसा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालेला नाही. आता ‘स्पुटनिक-व्ही’च्या उपलब्धतेमुळे लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे.