अनिल देशमुख हाजीर हो! सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार देताच ईडीचे पुन्हा समन्स

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. विशेष म्हणजे ईडीने देशमुख यांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ईडीने देशमुख यांना समन्स पाठवले आहेत. या समन्सनुसार देशमुख यांना २ ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल व्हावं लागेल.
अनिल देशमुख यांनी ईडीकडून अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांची ईडीने अटक करु नये ही मागणी देखील मान्य केलेली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.




