अविनाश भोसलेंचा मुलगा अमितची ईडीकडून ५ तास कसून चौकशी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याची आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ५ तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अविनाश भोसले, अमित भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टाने अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना चौकशीला समोरे जाण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले, अमित भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे. अविनाश भोसले यांना यांना १ जुलैरोजी तर अमित यांना आज २ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. त्यानुसार अमित भोसले आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची आज पाच तास कसून चौकशी झाली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.
बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने ११ फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.




