
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली. पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केलं. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. मात्र, आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने सागर बंगल्यावरील आंदोलन थांबवलं असलं तरी भाजपच्या कार्यालयांवर होणारं आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही पटोले यांनी आज स्पष्ट केलं.
भाजपच्या आसामच्या मुख्यमंत्र्याने महिलांचा अवमान केला. मोदींनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याचाच आम्ही निषेध करत आहोत. भाजपने त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना रस्त्यावर उतरलं. मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं. आम्ही तत्त्वाची लढाई लढत आहोत. आम्ही हे कदापी सहन करणार नाही. आजचं आंदोलन आम्ही थांबवलं आहे. पण भाजप खासदारांच्या घरासमोरी आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
हा राज्य छत्रपती शिवराय, शाहु, फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राष्ट्रसंतांची भुमी आहे.
या महाराष्ट्राचा अपमा करण्याचा काम पंतप्रधानांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील जनतेला त्रास नको आणि कायदा सुव्यवस्थेचा पालन करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
#मोदी_माफी_मागा pic.twitter.com/l2o1w8zKZS— Nana Patole (@NANA_PATOLE) February 14, 2022
कधी आंदोलन करू हे आम्ही ठरवू. तुम्हाला कळवलं जाईल. पण मोदी माफी मागत नाही. आसामच्या मुख्यमंत्र्याने महिलांचा अपमान केला. आईचा अपमान केला. ते जोपर्यंत माफी मागत नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. मुंबईकरांची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन थांबवत आहोत. हे देश विकणारे लोक आहेत, असा घणाघाती हल्लाही पटोले यांनी चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. दुसरीकडे प्रसाद लाडांसारखे अण्णा हजारांच्या वक्तव्याचा आधार घेत आहेत. मात्र, आम्ही अण्णा हजारेंवर काहीच बोलायचं नाही, असं ठरवल्याचे ते म्हणाले.
पटोले म्हणाले की, प्रसाद लाड तुम्ही काल जे बोललात, ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यामुळे तुमचे विचार काय, हे महाराष्ट्रात कळून चुकले आहे. आता आम्ही अण्णा हजारे साहेबांबाबत एकही शब्द बोलणार नाही. एखाद्या आईवर शंका घ्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. आता काहीही होवो. मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत. देश विकणारे सरकार दिल्लीत बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पोहचले होते. तेव्हा भाजपा कार्यकर्तेही फडणवीसांच्या घराबाहेर जमले. यावेळी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी फडणवीसांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. भाजप कार्यकर्त्यांचीही पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवा, आम्हीही आक्रमक करु शकतो. तुम्हाला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करायचे असेल तर उत्तर मुंबईतून सुरु करा असं आव्हान खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले आहे.
प्रसाद लाड यांनी दिला होता आक्रमक इशारा
भाजप आ. प्रसाद लाड यांनी काँग्रेसला इशारा दिला होता. लाड म्हणाले होते की, नाना, तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतो. उद्या तू सागरवर ये, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीपण भाजपवासी नाही. पाहतो तू कसा परत जातो ते, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिले होते. यावर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रसाद लाड यांना प्रसाद लाड हे फडणवीसांच्या बंगल्यावरचा वॉचमन असल्याचं म्हणत आम्ही येणार, तुमच्याने जी गुंडगिरी करायची आहे ती करा, नाहीतरी भाजप आता गुंडांचाच पक्ष झाल्याचा टोला लगावला होता.
मुंबईकरांची मोठी गैरसोय
भाजप आणि कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. पण मुंबईतील अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र कॉंग्रेसकडून आंदोलन मागे घेण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनाला नौटंकी म्हटले आहे. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही पहायला मिळाले. मुंबईत अनेक ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.
कोणाचीही हिंमत नाही, इथे येऊन निदर्शने करण्याची : फडणवीस
कोणाचीही हिंमत नाही, ते इथ येऊन निदर्शने करतील. मोदीजींनी माफी मागण्याचा सवाल नाही. कॉंग्रेसने देशाचा बट्याबोळ केला आहे. हे सगळे नौटंकीबाज लोक आहेत, कितीही नौटंकी केली तरीही करूद्यात, अशा शब्दा नाना पटोलेंच्या आंदोलनाचा समाचार फडणवीस यांनी घेतला. नाना पटोलेंची ही सगळी नौटंकी असल्याचेही फडणवीस म्हणाले.
कॉंग्रेसची अपयश झाकण्याची नौटंकी असल्याचे मत भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केले. दिल्लीत महत्व वाढाव म्हणून कॉंग्रेसचे आंदोलन असल्याचेही ते म्हणाले. आदरणीय पंतप्रधानांनी सत्यकथन केले आहे, पराजय लपवण्यासाठी नौटंकी असल्याचेही ते म्हणाले. हायकमांडसमोर किंमत वाढवण्यासाठी हा सगळा स्टंट असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील हायकमांड दोन महिने भेटत नाही, इतर पक्ष महत्व देत नाहीत. अशा स्थितीत पोलीस दलाचा गैरवापर करत भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
केम्स कॉर्नर, कुलाबा, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या. आमदार तसेच खासदारांना नोटीसा देण्यात आल्या. पोलिसांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात नेत्यांना अटकही केली. मुंबई पोलिसांची झुंडशाही महाराष्ट्राने पाहिल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.




