
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पोहोचले. ते येथे केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. उद्या सकाळी १०:४५ वाजता ते पंतप्रधान मोदी यांना, तर १२:३० वाजता जे. पी. नड्डा यांना भेटतील. आज योगींनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
यातच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही बैठक विशेष मानली जात आहे. उद्या योगी या दोन्ही नेत्यांना भेटतील. मात्र, यापूर्वीच नड्डा पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी दिल्लीतील युपी भवनात गेले. येथे काही वेळ थांबल्यानंतर, ते गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानी गेले. येथे दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास चर्चा झाली. ते उद्या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. सांगण्यात येते, की भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरेल. याच बरोबर उत्तर प्रदेश संघटन आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही चर्चा होऊ शकते. याचवेळी ए. के. शर्मा यांच्याबाबतीतही निर्णय होऊ शकतो.
अनुप्रिया पटेल यांनीही घेतली शाहंची भेट
एनडीएचा घटक पक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनीही आज गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर, खासदार अनुप्रिया पटेल यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. या बैठकीकडेही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टाने पाहिले जात आहे.
योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, ही दर महिन्याला होणारी रुटीन बैठक होती, असे सांगण्यात आले. पण, या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.




