राजकारण

सुरगाणा नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी सहलीवर गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगरसेवकांच्या सहलीत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविकेचा एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आज सकाळी ही घटना घडली असून काशीबाई नागू पवार असे मृत्यू झालेल्या नगरसेविकेचे नाव आहे.

सुरगाण्यात येत्या १५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ऐनवेळी सभागृहात येऊन आपले बहुमत जाहीर करण्याचे भाजपचे नियोजन हेते. निवडणुकीत कुठलाही घोडेबाजार होऊ नये या उद्देशाने भाजपच्या नगरसेवकांची सहल आयोजित करण्यात आली होती. गुजरातमधील एका हॉटेलमध्ये शनिवारी सर्व नगरसेवक मुक्कामी होते. या सर्व नगरसेवकांसोबत सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून निवडून आलेल्या काशीबाई पवार याही होत्या. रविवारी सकाळी हॉटेलमध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पवार यांच्या मृत्यूमुळे सुरगाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच पवार या आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राबाहेर फिरायला गेल्या होत्या. कुटंबासोबतच्या सहलीवरून परत येऊन त्या शनिवारी रात्री भाजपच्या सहलीत सहभागी झाल्या होत्या. काशीबाई यांच्या सूनबाई अमृता या देखील सुरगाण्यात नगरसेविका असून या घटनेवेळी त्याही काशीबाई यांच्या सोबतच हॉटेलमध्ये होत्या. दरम्यान, या घटनेमुळे सुरगाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नगराध्यक्ष निवडणुकीत आता नक्की काय होणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button