वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ‘डॅशिंग’ महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या. आज सायंकाळी 7 वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक उच्चपदस्थ वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. दीपाली चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, हरीसाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प असं महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय.
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. गेल्या महिन्यात पोलिस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दीपाली चव्हाण यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. दीपाली यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शासकीय बंदुकीतल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर मारून घेतल्या, अशी माहिती आहे. त्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचितांनी वर्तविला आहे.
एका माहितीप्रमाणे, दीपालीला एक उच्चपदस्थ वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दीपालीची त्यांनी कानउघाडणी केल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी दीपाली यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात काय लिहिले ते समजू शकलेले नाही.
दीपाली यांनी धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना नामोहरम केले होते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. सोमवारीच दीपाली यांनी प्रा. आ. केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.




