रायगड किनारपट्टीवर मध्यरात्री चक्रीवादळ धडकणार; नागरिकांचे स्थलांतर सुरू

अलिबाग : गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच केली आहे. आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा तडाखा किती असेल हे सांगता येत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
तौक्ते चक्रीवादळाबाबत आज जिल्हा प्रशासनाने माहिती दिली. रात्री उशिरा तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील १६०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वादळाबरोबरच रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. यावेळी कुणीही घराबाहेर पडू नका, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रत्नागिरीत समुद्र खवळला
तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असं वादळाचं रौद्ररुप बघायला मिळतंय. तसेच जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी परिसरात ताशी ९० किमी वेगाने वारा वाहतोय. तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेला निघालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येत आहे. तौत्के चक्रीवादळ गोव्याकडून आता कोकण किनारपट्टीच्या शेजारून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार वारे वाहत आहेत. तसेच मुसळधार पाऊसही पडत आहे.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. तसेच आंब्याचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. एकूणच सिंधुदुर्गातील अनेक गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती समोर आली आहे. सावंतवाडी ते वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अनेक झाडं चक्रीवादळाने उन्मळून पडली आहेत. इलेक्ट्रिक पोलही अनेक ठिकाणी पडले आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांवरील सर्व अडथळे दूर करण्याचं काम सुरू केलं आहे.
गोव्यातील पणजी कारवार कोचीन महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळला. हा वृक्ष कोसळल्याने महमार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चक्रीवादळामुळे वृक्ष कोसळला. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफकडून मार्ग मोकळा करण्यास सुरूवात करण्यात आली.




