Top Newsस्पोर्ट्स

भारतीय क्रिकेट संघावरील कोरोनाचे संकट गडद, आणखी दोन खेळाडूंना कोरोना

नवी दिल्ली : भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. टीम इंडियानं वन डे मालिका २-१नं जिंकली, तर श्रीलंकेलनं ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना विलगीकरणात जावे लागले. या आठ खेळाडूंमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता आणि आता त्यांचे इंग्लंडला जाणे अवघड वाटत आहे.

पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव हे खेळाडू सध्या श्रीलंकेत विलगीकरणातच आहेत. या ९ खेळाडूंव्यतिरिक्त टीम इंडियाचे अन्य खेळाडू मायदेशासाठी रवाना झाले आहेत. लंडन आरोग्य विभागाच्या नियमानुसार पृथ्वी व सूर्यकुमार यांना इंग्लंडमध्ये इतक्यात प्रवेश मिळणे अवघड आहे. याक्षणी आम्ही याबाबत काहीच सांगू शकत नाही. पुढील काही दिवस आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याएवजी कोणाला पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यांना रिप्लेसमेंट म्हणून पृथ्वी व सूर्यकुमार यादवची निवड झाली. पण, श्रीलंका दौऱ्यावर कोरोना पॉझिटिव्ह कृणालच्या संपर्कात आल्यामुळे या दोघांना विलगिकरणात जावे लागले. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ते आणखी काही दिवस श्रीलंकेतच असणार आहेत. पुढील तीन दिवस त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. पृथ्वी व सूर्यकुमार हे दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणे अपेक्षित होते. १२ ऑगस्टला ही कसोटी सुरू होणार आहे, परंतु आता ते लंडनच्या नियमानुसार पात्र ठरतील की नाही, याबाबत साशंकता आहे.

आणखी २ खेळाडूंना कोरोना

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात टीम इंडियाचे ८ खेळाडू आले होते आणि त्यांना विलगिकरणात रहावे लागले होते. त्यापैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृष्णप्पा गौथम आणि युजवेंद्र चहल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना आणखी ७ दिवस विलगीकरणात रहावे लागेल. कृणालसह विलगीकरणात असलेले ९ खेळाडू टीम इंडियासोबत भारतात परतणार नाहीत. त्यांच्याशिवाय अन्य भारतीय खेळाडू आज मायदेशात परततील, पण ही ९ खेळाडू सर्व फॉरमॅलिटी पूर्ण केल्यानंतरच मायदेशात परततील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button