आरोग्य

कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक

मुंबई : गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर सतत वाढत गेलेला कोरोनाचा विळखा आणखी धडकी भरवू लागला आहे. वर्षअखेरीस नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून राज्यात बुधवारी ९ हजार ८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी नोंदण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक २२०९ रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात आहेत. त्यात मुंबईत ११२१, नागपूरमध्ये ९२४, पुणे ८५७, नाशिक ५९८, अमरावती ४८३, पिंपरी ४६१, औरंगाबाद ४८३ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दिवसभरात ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१ लाख ७९ हजार १८५ झाली आहे. तर राज्यात एकूण मृत्यू ५२ हजार २८० झाले आहेत.

आतापर्यंत एकूण २० लाख ४३ हजार ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ टक्के झाले असून मृत्युदर २.४० टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या घडीला राज्यात ८२ हजार ३४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

राज्यात कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button