राजकारण

चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा; संजय राऊतांनी केंद्राला पुन्हा डिवचले

मुंबई: वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. देशांमध्ये कोणाचे फोन टॅप होत नाहीत हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील. हा आता राजकीय मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले.

नाना पटोले यांनी काल ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते असा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधित सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button