Top Newsआरोग्य

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ‘माझा डॉक्टर्स’ बनून सज्ज राहा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेहि आपली नावे नोंदवावी असे आव्हान करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे. राज्यात १२७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो मात्र कोविड मुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

स्टीरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या ‘म्यूकर मायकॉसिस’मध्ये काय उपचार करावेत, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिव्हीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटीलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रशन आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

लहान मुलांकडे लक्ष ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धीओका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वारात्नुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.

दुसऱ्या लाटेचा मुकाबला करीत असतांनाचा तिसऱ्या संभाव्य लाटेचे नियोजन करून त्यात विशेषत: खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबधल आजच्या सभेतील अनेक डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन झाले तसेच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचेही काही डॉक्टर्स म्हणाले. अनेक डॉक्टर्सनी तर ही ऑनलाईन सभा सुरु असतानाच कोविड लढाईत काम करण्याची इच्छा असून त्यासाठी विचारणाही केली तर काही डॉक्टर्सनी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घ्यावे अशी विनंतीही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button