साहित्य-कला

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई : मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये किरण गुरव यांना ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादबंरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार, कसदार अशा साहित्यामध्ये मराठी साहित्यकृतींनी भर घालण्याचे महत्वाचे योगदान या सर्वांनी दिले आहे.

माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण जागर सुरु केला आहे. या प्रयत्नात पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींमधून मराठीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचीही चर्चा होत राहील. त्यादृष्टीने या साहित्यकृती राष्ट्रीय स्तरावर पोहचणे महत्वाचे आहे. हे यश उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button