Top Newsराजकारण

मालेगावात काँग्रेसला खिंडार; हा विषय फार गंभीर नाही : नाना पटोले

काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत, रशीद खान यांनी घेतलेला निर्णय योग्य : अजित पवार

मुंबई : मालेगावमधील काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जे काही चाललयं ते मंथनाच काम आहे. त्यांचे लोक आमच्याकडे आले, आमचे लोक त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांनी आमचे थोडे फार नेलेत तर आमच्याकडेही त्यांचे जास्त लोक येणार आहेत. त्यामुळे याबाबतची नाराजी हा राजकारणातला भाग आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा विषय फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे वक्तव्य पटोलेंनी केले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे गैरहजर राहिले. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, ऊर्जा विभागातील अडचणींचा पाढा त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर वाचला आहे. विभागात सुरू असणाऱ्या गैरप्रकारही त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहेत. त्यामुळे नाराजी नसल्याचे पटोलेंनी स्पष्ट केले. या बैठकीला ते उपस्थित राहणे अपेक्षितही नव्हते, हादेखील खुलासा त्यांनी केला.

काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत, रशीद खान यांनी घेतलेला निर्णय योग्य : अजित पवार

मालेगावमध्ये काँग्रेस महापालिकेला मोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार आणि महापौर यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. रशीद शेख यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचंड मोठी रॅली मालेगावमध्ये अरेंन्ज करून संपूर्ण मालेगाव परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमय करून टाकू, असा त्यांचा आग्रह होता. आमचाही आग्रह सुरू होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि नियमावलीमुळे कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं. मात्र, कोरोनाचं सावट कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम मुंबईत घेण्याचे ठरवले, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माजी आमदार रशीद शेख आणि माजी महापौर यांच्यासोबत ९० च्या दशकात संबंध आला. त्यावेळी ते आमदार झाले होते. त्यानंतर जयंत पाटील, छगन भुजबळांसह माझ्याशी त्यांचा संबंध आला होता. त्यांच्यासोबत आम्ही आघाडीसोबत काम करत होतो. सतत मालेगावाचे प्रश्न सांगण्याचे काम ते विधीमंडळात करत होते. तसेच ते पाठपुरवठा देखील करत असत, असं पवार म्हणाले.

अनेक वर्ष तुमच्या सर्वांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. एक कुटुंब म्हणून त्यांनी तुम्हाला सांभाळलं. कधीही कुठली अडचण असेल तर रशीद शेख आपल्याला मदत करणारच, हा विश्वास मालेगावकरांना आहे. त्यांचं वय जरी झालेलं असलं तरी त्यांची समाजाशी बांधिलकी आहे. ती बांधिलकी त्यांनी कधीही कमी होऊन दिलेली नाहीये. त्यामुळे हेच त्यांची ताकद, शक्ती आणि पाठीमागचं कारण आहे. आज एखादा नेता जर दुसऱ्या पक्षात निघाला तर सर्वच नगरसेवक त्यांच्यासोबत येतात असं नाहीये. मात्र, हे रशीद शेख यांच्या स्वभावामुळे घडलं आहे. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ५० ते ६० वर्षे समाजकारण आणि राजकारण करत असताना त्यांनी कधीच जातीचा विचार केला नाही. संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व समाज पुढे घेऊन जायला पाहीजे, असे शरद पवारांचे विचार आहेत. काँग्रेससोबत आघाडी करताना अल्पसंख्याक आणि अल्पविभाग हा काँग्रेसकडे असायचा. मात्र, आता तो आपल्याकडे आला पाहीजे असं शरद पवारांचं म्हणणं होतं. त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही चर्चा करत असताना तो विभाग आमच्याकडे आला.

नवाब मलिक यांच्याकडे जो विभाग आहे. त्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरूण-तरूणींना उभं करण्याचं काम आपण करतो. आपल्या समाजामध्ये शिक्षण इतरांच्या तुलनेने कमी आहे. मुला-मुलींच्या शिक्षणाला आपल्याला कशापद्धतीने महत्त्व देता येईल. तिथे मदत कशी करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

रशीद शेख यांनी आम्हाला निधी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना निधी देणं हे आमचं कर्तव्य आहे. कर्तव्याच्या भावनेतून जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह आम्ही निधी दिला. परंतु त्यांनी मार्च महिन्यामध्ये आणखीन काही निधीची गरज असल्याची माहिती आम्हाला दिली आहे. मात्र, मार्च महिन्याआधी आम्ही त्यांना निधी देणार, असा विश्वास अजित पवार यांनी दिलाय. ११ तारखेला आम्ही नवीन अर्थसंकल्प सभागृहात सादर करणार आहोत. रशीद खान यांनी जो निर्णय घेतला आहे. तो योग्य असून कृतीतून आणि कामातून सिद्ध करून दाखवू अशी ग्वाही मी देऊ इच्छितो. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू, असं पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button