राजकारण

शिवसेनेला विदर्भात मोठा झटका; माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे राष्ट्रवादीत

नागपूर : शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे राष्ट्रवादीत गेल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील शिवसेनेत असलेल्या असंतोषाची कारणं मुंबईहून मागवल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला तातडीने मुंबईत बोलावणं आल्याचीही माहिती आहे.

शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याने सेनेत स्फोट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरातील डझनभर जुन्या शिवसैनिकांनी शिवबंधन तोडलं. मराठी माणसांच्या शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय, असा आरोप करत शेखर सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी जवळपास २० वर्षे शिवसेनेत राहिलो. पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही, असंही ते म्हणाले होते. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती. परंतु “आपले नेते खा. गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?” असा सवाल उपस्थित करुन त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने सेनेला मोठा धक्का बसलेला आहे.

विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे. शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो. आता नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशातच सावरबांधे यांच्या धक्कातंत्राने शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

दोन महिन्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता शेखर सावरबांधे यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button