राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? भाजपाचा राष्ट्रवादीला टोला

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात कायद्याचं राज्य आहे की केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे अशी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दरेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक करतात. पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिक, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशा शब्दात दरेकरांनी मलिकांना फटकारलं आहे.
या देशात कायद्याचं राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा -बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली होती.




