
दुबई : टी२० विश्वचषकातील सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेला ७ विकेट्सनी मात देत विजय मिळवला आहे. या विजयासह आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याचाही फॉर्म परतला आहे. सामन्यात त्याने अप्रतिम अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेनं दिलेलं १५५ धावांचं आव्हान १८ चेंडू आणि सात विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. विजयासह ऑस्ट्रेलिया आता ‘अ’ गटात ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या खात्यातही ४ गुण असले तरी नेट रनरेटच्या जोरावर संघ पहिल्या स्थानावर आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ ऑव्हरमध्ये केवळ १२ धावा देत २ विकेट्सही घेतल्या. त्याच्याशिवाय पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्च यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि असलंका यांनी प्रत्येकी ३५ तर भानुका राजपक्ष याने ३३ धावा केल्या. ज्याच्या जोरावर श्रीलंका संघ १५४ धावसंख्या करु शकला.
श्रीलंकेच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी खणखणीत सुरुवात केली. कर्णधार अरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांना चांगला सूर गवसल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी सलामीसाठी ७० धावांची भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरनं ४२ चेंडूत १० चौकारांच्या साथीनं ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तर फिंचनं २३ चेंडूत ३७ धावांचं योगदान दिलं. मॅक्सवेल यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. मॅक्सवेल ५ धावांवरच माघारी परतला. स्टीव्ह स्मिथ नाबाद २८ आणि मार्कस स्टॉयनिस नाबाद १६ यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेकडून हसरंगा डीसिव्हानं ४ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. तर शनाकानं १ विकेट मिळवली.
श्रीलंकेच्या सुरुवातीच्या फळीचा फॉर्म याही सामन्यात डळमळीत झालेला पाहायला मिळाला. सलामीवीर पी.निस्संका अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कुशल परेरा आणि असलंगा यांनी सावध खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. परेरानं २५ चेंडूत ३५ आणि असलंगानं २७ चेंडूत ३५ धावा केल्या. अविश्का फर्नांडो (४), हसरंग डीसिल्वा (४), दसुन शनाका (१२) अपयशी ठरले. भानुका राजपक्षेनं २६ चेंडूत नाबाद ३३ धावांचं योगदान देत संघाला १५० धावांचा आकडा प्राप्त करुन दिला होता. तर चमिका करुणारत्ने ९ धावांवर नाबाद राहिला. २० षटकांच्या अखेरीस श्रीलंकेला ६ बाद १५४ धावा करता आल्या होत्या.




