नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सकाळी नारायण राणे, कपिल पाटील आणि भारती पवार या महाराष्ट्रातील खासदारांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पाटील-राणे कधीही महाराष्ट्रात कोणत्याही प्रश्नावर एकत्र आले नव्हते. आज दोघेही मोदींच्या भेटीला गेले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चाही दिल्लीच्या वर्तुळात आहे. दरम्यान, भारती पवार यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे केंद्रीय राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे.
भाजप नेते नारायण राणे यांना काल अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा फोन आला. फोन येताच राणे गोव्याच्या दिशेने गेले आणि गोव्यावरून थेट दिल्ली गाठली. राणे दिल्लीत जात नाही तोच खासदार भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही दिल्लीकडे प्रयाण केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चांनी जोर धरला.
आज संध्याकाळीच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दिल्लीत लगबग सुरू झाली. राणे आणि पाटील यांनीही आज सकाळी ११ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवर पोहोचले. यावेळी जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. यावेळी मोदींनी या नेत्यांशी हस्तांदोलन केलं तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राणे आणि पाटील यांनी मोदींचे आभार मानले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भारती पवार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा
आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आता त्यात महाराष्ट्रातून आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. नाशिकच्या खासदार भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारती पवार यांनीही आज सकाळी मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे केंद्रीय राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे.




